Pune District : पहिल्या पावसातच राजगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था

वेल्हे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने माती सगळी रस्त्यावर वाहून आली असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात सर्वच रस्त्यांची अवस्था एकदम दयनीय झाली असून याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्याची ओळख आहे. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो हे माहीत असूनही रस्त्यांबाबत ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. ठेकेदार व अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने रस्ते दर्जेदार होत नाहीत एकही रस्ता असा नाही की जो एक वर्षाच्या आत खराब होत नाही. दर्जाहीन कामे करायची व वारंवार दुरुस्तीसाठी निधी टाकायचा आणि आपले हात ओले करून घ्यायचे असेच सध्या राजगड तालुक्यात चित्र असून वारंवार तक्रारी करून सुद्धा ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन कोणीच लक्ष देत नाही.
मुळातच रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी राजगड तालुक्यामध्ये येत असतानाही काही राजकीय मंडळी व स्थानिक विविध पक्षाचे नेते आणि बांधकाम विभागाचे अधिकारी हे ठेकेदारांना पाठीशी घालतात व त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जाहीन झाली आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे शिवाय राजगड तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही अपघातांच्या भीतीमुळे रोडावली असून स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासर्व गोष्टींची दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
शासनाच्या विविध विभागामार्फत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विकास कामांसाठी थेट निधी मिळतो, काही छोटी छोटी कामे ग्रामपंचायत करते असे दाखविले जाते मात्र तिथे पण छोट्या छोट्या ठेकेदारांनी घुसखोरी केली असून ही कामे म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा पॉकेट मणी ठरत आहेत तर काही मोठ्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या मार्फत निविदा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
परंतु ठेकेदार व अधिकारी यांचे साटेलोटे झाले असून काम मिळवण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये वाढल्याने कमी दराने निविदा भरण्यात येतात अंदाजपत्रका पेक्षा 20% किंवा त्याहीपेक्षा जास्त कमी दराने निविदा भरल्या जातात व त्या मंजूरही होतात मग कामे तरी कशी दर्जेदार होणार. विविध राजकीय पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सुद्धा आपापल्या ठेकेदारांचे ग्रुप तयार केले आहेत. त्यामुळे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन कोणाचाच वचक राहिला नसल्याने राजगड तालुका जुन्या वेल्हे तालुक्यासारखा भ्रष्टाचाराचे कुरण ठरतो की काय असे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले.
ज्या ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये दर्जाहीन कामे झाली आहेत किंवा चालू आहेत अशा ठिकाणच्या सरपंच, बांधकाम अधिकारी, ठेकेदार, ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशीच कामे होत राहणार.स्थानिकांनी सुद्धा गटातटाच्या आहारी जाऊन चुकीच्या कामांचे समर्थन करू नये.
– शेखर लिम्हण, ग्रामस्थ विंझर /
विजय शिंदे ग्रामस्थ केळद (ता. राजगड)





