पुणे जिल्हा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविणार

-विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी निर्णय : शिक्षणमंत्री केसरकर यांचे आश्वासन
मंचर – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याची माहिती पुणे जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रोडे यांनी दिली.
जवाहर बाल भवन मुंबई येथे राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील विविध संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. यावेळी झालेल्या चर्चेत-राज्यात सीबीएसईप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली, तिसरी,सहावी, नववी या वर्गांपासून अभ्यासक्रम राबविणार, सध्याच्या काही विषय योजनेत बदल करून सीबीएसई प्रमाणे विषय योजना राबवणार,शैक्षणिक वर्षाचे अध्यापनाचे कामकाज २३० दिवसांचे असणार, शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरुवात उन्हाळ्याची सुट्टी केवळ मे महिन्यात असणार,मूल्यमापन योजनेतही सीबीएसईप्रमाणे बदल,
नववी,दहावी व अकरावी,बारावी वर्गांना सेमिस्टर पद्धत लागू करण्याचा विचार इत्यादी राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषता यूपीएससी परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होण्यासाठी सीबीएसई अभ्यासक्रम उपयुक्त असल्याने वरील बदल राज्य शासनाने स्वीकारला असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मात्र, शालेय वेळा, दहावी-बारावीची परीक्षा दोन सत्रात घेण्यास महासंघाच्या वतीने विरोध करण्यात आला.
एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,संच मान्यता करताना विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी. त्रूटी असलेल्या संचा मान्यतांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. यासह इतर विषयांवरती चर्चा करण्यात आली. यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुढीलप्रमाणे आश्वासन दिले.
टप्पा वाढ जूनपासून…
कॅबिनेटच्या बैठकीत सोमवार, दि. २३ सप्टेंबर रोजी टप्पा वाढीचा निर्णय घेण्यात येणार असून ही टप्पा वाढ जूनपासून लागू होणार,डिसेंबर २४ च्या वेतनात फरकसह वेतन अदा करणार असल्याचे सांगितले. आय टी शिक्षकांच्या समायोजनाचा शासनादेश पुढील आठवड्यात काढण्याच्या सूचना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपसचिवांना दिल्या. राज्याच्या मुख्य सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांजरे, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी, उपसचिव तुषार महाजन, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव संतोष फाजगे, विक्रम काळे, लक्ष्मण रोडे, एन. बी. शेजवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.





