Baramati : बारामतीत मतदारांना पैसे वाटपाचा आरोप; व्हिडिओ व्हायरल
Baramati : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या व्हिडिओमुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

बारामती : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान बारामतीत मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांचे पती योगेश नाळे हे एका व्यक्तीला पैसे देताना दिसत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून बारामतीत राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी या कथित प्रकारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या व्हिडिओमुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, व्हिडिओतील प्रसंगाचे नेमके स्वरूप काय, संबंधित व्यक्तीला पैसे कोणत्या कारणासाठी देण्यात आले आणि या प्रकरणात निवडणूक नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.
योगेश नाळे यांचा खुलासा
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना योगेश नाळे यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळला आहे. संबंधित व्हिडिओ विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला. बूथवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याच्या चहा-पाणी आणि नाश्त्याच्या खर्चासाठी आपण पैसे देत होतो. ज्या व्यक्तीला पैसे दिले, ती बारामतीची मतदार नसल्याचेही नाळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे व्हायरल व्हिडिओवरून उपस्थित झालेल्या आरोपांची सत्यता, पैशांच्या देवाणघेवाणीमागील कारण आणि निवडणूक यंत्रणेची भूमिका याकडे आता लक्ष लागले आहे.





