Jejuri : जेजुरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन
Jejuri : विशेष म्हणजे, जेजुरी गडावर खंडेरायाच्या दिवसाची सुरुवात ज्या पहाटेच्या भूपाळीने होते, ती भूपाळी पेशवेकालीन शाहिर सगनभाऊ यांनी लिहिलेली आहे.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जत्रा, यात्रा आणि दैनंदिन धार्मिक विधी-परंपरांमध्ये अठरा पगड जाती-धर्मांतील समाजबांधवांना विविध मानपान लाभलेले आहेत. हे मानपान परंपरेने पाळत समस्त जेजुरीकर बांधव आपली सेवा-चाकरी बजावून भक्ती श्रींच्या चरणी अर्पण करतात. यातूनच जेजुरी नगरीतील सामाजिक सलोखा आणि धार्मिक बांधिलकीचे दर्शन घडते.
या धार्मिक परंपरेमध्ये जेजुरीतील मुस्लिम बांधवांनाही सन्मानाचा आणि महत्त्वाचा मान आहे. खंडेरायाचा मानाचा अश्व सांभाळणारे खान (घोडेवाले), म्हाळसादेवी व बाणाईला चुडा अर्पण करणारे मणेर, श्रींच्या पालखी सोहळ्यापुढे ताशा वाजवणारे मुलाणी, तसेच मानाचा अश्व अर्पण करणारे आणि सोमवती व दसरा उत्सवात पालखी सोहळा नगरीतील जामा मशिदीसमोर आला असता भंडाऱ्याची उधळण करत पानांचा विडा अर्पण करणारे ‘पानसरे’ परिवार यांसह अनेक मुस्लिम समाजबांधव मोठ्या श्रद्धेने खंडेरायाच्या उत्सवांमध्ये सहभागी होतात.
सगनभाऊंच्या भूपाळीने होते दिवसाची सुरुवात
विशेष म्हणजे, जेजुरी गडावर खंडेरायाच्या दिवसाची सुरुवात ज्या पहाटेच्या भूपाळीने होते, ती भूपाळी पेशवेकालीन शाहिर सगनभाऊ यांनी लिहिलेली आहे. खंडोबा मंदिरात पहाटेच्या नित्यपूजेच्या वेळी ही भूपाळी आजही मानकरी व पुजारी वर्गाकडून अत्यंत भावपूर्ण वातावरणात गायली जाते. हीच सर्वधर्मसमभावाची परंपरा जेजुरीचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे.





