दिवे : पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी-सासवड पालखीमार्ग म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यातील झेंडेवाडी पासून पवारवाडी या परिसरातील महामार्गावर कित्येकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या मार्गावरील अपघातांची मालिका सतत सुरूच असून शुक्रवारी (दि. 10) पुन्हा एसटीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात एसटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय काळुराम कोंढाळकर (वय 67 रा. जाधवगड, दिवे) यांचा मृत्यू झाला आहे. पृथ्वीराज अशोक ढुम (रा. ढुमेवाडी, दिवे, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर तुळशीराम भांदुर्गे (वय 31, बारामती डेपो, मूळ रा. योवता, ता. रिसोड, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बसचालकाचे नाव आहे. मृत विजय कोंढाळकर हे दुचाकी (एमएच 12 युएल 9436) वरून ढुमेवाडीवरुन जाधव गड रोड येथे घराकडे निघाले होते. दरम्यान मयत विजय कोंढाळकर सकाळी 11.45 दरम्यान रस्ता क्रॉस करीत होते त्याचवेळी त्यांना बारामती आगाराची एसटीबस (एमएच 14 केक्यु 5041)ची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.