Pune District : श्वानदंशाच्या लसीसाठी सिरिंजही मिळेना

वरवंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत रुग्णसेवेला तिलांजली दिली जात आहे. श्वानदंशाच्या लसीसाठी सिरिंजही मिळत नाही. रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून पदरमोड करून सिरींज आणावी लागत आहे. वरिष्ठ कार्यालयातून पुरवठा झाला नसल्याचे कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वरवंडचे आरोग्य केंद्र हे सिरींजलाही महाग झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
वरवंड येथे आरोग्य केंद्रात वरवंड, चौफुला, पडवी, कुसेगाव, कडेठाण, पाटससह अन्य गावातील गरीब रुग्ण, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार मोफत उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णांना बाहेरील मेडिकलमधून विकत सिरीज आणायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार (दि.१८) समोर आला आहे. मोफत रुग्णसेवेच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
पाटस येथील ज्येष्ठ नागरिकांस पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. ते वरवंड केंद्रात उपचारासाठी गेले. त्याठिकाणी रेबीज लस उपलब्ध होती. मात्र, सिरिंज उपलब्ध नव्हती. बाहेरील मेडिकलमधून डॉक्टर व परिचारकांनी पेशंटच्या नातेवाईकांना हे सिरींज आणण्यासाठी केसपेपरवर लिहून दिले. नातेवाईकांनी मात्र दहा रुपये किमतीचे सिरिंज बाहेरून विकत आणले. पुढील चार इंजेक्शन घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी सांगितला होता. त्यानुसार (दि.१८) शेवटचे इंजेक्शन घेण्यासाठी ते पेशंट व त्यांचे नातेवाईक वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. त्यांना पुन्हा इंजेक्शन ठरलेल्या मेडिकलमधून विकत आणण्यासाठी सांगितले.
संबंधित रुग्णाने डॉ. टेकवडे यांना विचारणा केली असता म्हणाले की, शासनाच्याआरोग्य सेवा मोफत आहे. मात्र, शासनाकडून आम्हाला इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा आला नाही. मार्च महिना असल्याने तुटवडा आहे, असे उत्तरे देत दुर्लक्ष केले.
वरिष्ठांकडे मागणी केली
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिवरानी पांचाळ म्हणाल्या की, मी (दि.१८) भेटीसाठी दुसऱ्या गावी होते. आमच्याकडे श्वान दंशाचे दहा रुग्ण आले होते. आम्ही वरिष्ठ विभागाकडे वारंवार याची मागणी केली आहे. मात्र शासन आम्हाला पुरवठा करत नाहीत. आम्ही सर्वांनाच बाहेरून सिरिंज आणायला सांगतो. त्यामुळे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तरी आम्हाला शासनाकडूनच याचा पुरवठा होत नसल्याची माहिती मिळेल.
घटनेची सविस्तर माहिती घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवली आहे. उद्या बैठक असून याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
– डॉ. उज्वला जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, दौंड.





