Pune District: चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती व सासूच्या वादातून एका विवाहितेचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पती, सासूला अटक केली आहे. पौर्णिमा गणेश धोत्रे (वय २२, रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे) व नणंद सोनाली लखन (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव ढमढेरे येथील पौर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. विवाहानंतर पौर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली हो पौर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करीत तू केलेले जेवण जास्त बनवते, ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा, असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते.
वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून (दि.३०) मार्च रोजी पौर्णिमा हिने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान, पौर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारादरम्यान पौर्णिमा गणेश धोत्रे हिचा मृत्यू झाला. याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (डोंगरगाववाडी, लोणावळा, ता. मावळ) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली. गणेश धोत्रे व मंगल धोत्रे या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करीत आहेत.





