Pune District : मकोका गुन्ह्यात वर्षापासून फरार असलेला अटकेत

लोणी काळभोर : उरुळी देवाची येथे माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगत गोदामातील प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल असलेल्या मकोका कारवाईतील एक वर्षापासून फरारी असलेल्या तरुणाला अखेर लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 12 जानेवारी 2024 रोजी घडली होती.
युवराज बापू गुंड (वय 27, रा. उरुळी देवाची) असे करण्यात अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या अगोदर पोलिसांनी अण्णा उर्फ संतोष किसन देवकर (वय 34, रा. फुरसुंगी), शेखर अनिल मोडक (वय 29, रा. वडकी), साहस विश्वास पोळ (वय 25, रा. वडकी) व ऋषिकेश किसन खोड (वय 24, उरुळी देवाची) यांना बेड्या ठोकल्या होत्या. टोळी प्रमुख संतोष उर्फ आण्णा देवकर हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचाराचा वापर केला.
या टोळीने मागील 10 वर्षात खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींवर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 च्या कलमान्वये मोकाची कारवाई केली आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यातील चौघांना तत्काळ अटक केली होती. तर युवराज गुंड हा कारवाई झाल्यापासून फरार झाला होता. लोणी काळभोर पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना तो उरुळी देवाची येथे येणार असल्याची माहिती एका खबर्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.





