Pune District : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशआदेश
मंचर – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारावी.तसेच अखंडित वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा संदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना निर्देश दिले. बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील,खेडचे आमदार बाबाजी काळे, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे व समितीतील इतर सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी.
मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावे.त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोप वेची सुविधा विकसित करावी. निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करुन देण्याचेही नियोजन करावे.
या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करुन द्यावीत.तसेच राजगुरुनगर-तळेघर-भीमाशंकर महामार्ग हा सुरळित वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा.यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तसेच संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करुन कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.तसेच यावेळी श्री क्षेत्र भीमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा)२८८ कोटी १७ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
-दिलीप वळसे पाटील,माजी गृहमंत्री.





