शांत, सुस्वभावी, उच्चशिक्षित, प्रगतशील शेतकरी व सहकार क्षेत्रात आघाडीचे नाव असलेले महादेव वाघ एम.कॉम.एल.एल.बी. उच्चशिक्षीत असून सुद्धा नोकरीच्या मागे न लागता किंवा अन्य व्यवसाय न करता त्यांनी पूर्वांपार चालत आलेला शेती व्यवसाय निवडला. शेतीमध्ये कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, नियोजनबद्ध व्यवस्थापनातून आपली शेती फुलवली. एक प्रयोगशील व यशस्वी शेतकरी म्हणून संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखतो. वाघ यांना जिल्हा परिषदेच्या ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे जिल्हा फळबाग योजना समिती सदस्य असताना फळबागायतदारांच्या समस्या ‘योजना समिती’ पुढे मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
महादेव वाघ काळ्या आईची श्रद्धेने सेवा करीत असताना त्यामधून उभारलेला ‘श्रद्धा’ बंगल्यात गुण्यागोविंदाने नांदणारे आपले तीन भावांचे एकत्र कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंबाची जाणीव करून देते. तर नव्याने बांधलेला नारायणगावातील हस्ताईनगर येथील ‘महानंदा’ बंगला आपल्या आचार, विचार, बंधुप्रेम, कर्तुत्व व दातृत्व यांचा सुरेख संगम असून परिवार उच्चशिक्षित, सात्विक व संस्कारित आदर्श कुटुंब म्हणून वेगळी ओळख करुन देत आहे. वाघ यांना सामाजिक जीवनात काम करताना पत्नी नंदा, मुलगा गणेश (बीई कॉम्प्युटर), भाऊ मनोहर आणि प्रकाश यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
पिंपळवंडी गावच्या जडणघडणीत व ग्रामविकासामध्ये महादेव वाघ यांचा मोलाचा सहभाग असल्याने त्यांच्या ज्ञानाचा, शिक्षणाचा व कर्तुत्वाचा समाजाला फायदा होत आहे. पिंपळवंडी ग्रामपंचायतचे सरपंच असताना वाघ यांचे प्रशासन व संघटन कौशल्य पिंपळवंडी गावाने जवळून पाहिले आहे. सरपंच म्हणून काम करीत असताना महादेव वाघ यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने वाघ यांना सन्मानित करण्यात आले आहे. महादेव वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
महादेव वाघ यांच्या कामाचा आढावा
जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व यशवंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेणे गरजेचे आहे. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे राज्यात, देशात व परदेशात शेती अभ्यास दौरे करून त्यांनी ज्ञानवृद्धीत वाढ केली. आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ इतर शेतकर्यांना देऊन योग्य मार्गदर्शनाने प्रोत्साहित केल्याने अनेकांना योग्य दिशा सापडली आहे. पिंपळवंडी, नारायणगाव परिसरात मोठ्या क्षेत्रावर डोलणार्या द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागा त्यांच्या कर्तबगारीची जाणीव करून देतात. महादेव वाघ यांच्या मुलांनी चांगल्या नोकर्या सोडून द्राक्ष आणि इतर फळांची जगभर निर्यात करण्यासाठी ’हस्ताई ग्रो प्रोड्युसर कंपनी’ स्थापन केली असून चालू हंगामात फळांची निर्यात केली जाणार आहे.
शरदचंद्र पवार श्रद्धास्थान
देशाचे धुरंदर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर महादेव वाघ यांची आढळनिष्ठा असून त्यांच्या विचारांच्या आधारे राजकीय वाटचाल सुरू आहे. तालुक्याचे कार्य कुशल माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या नेतृत्वावरील विश्वास, पिंपळवंडी गावचे सुपुत्र व पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लेंडे साहेब यांची मिळालेली खंबीर साथ यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. त्यांच्याच संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या पडीक व दुर्लक्षित जागेवर साकारलेले ‘यशवंत उद्यान’ आजही पिंपळवंडी गावच्या वैभवात भर घालीत आहे. यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सहकार्यांना, सेवकांना व सभासदांना बरोबर घेऊन त्यांच्याही विचारांना व कल्पकतेला वाव देऊन सर्वांना अभिमान वाटावा अशी आपली कामगिरी महादेव वाघ यांनी केली आहे.
शब्दांकन : लक्ष्मण मंडलिक
संकलन : मंगेश रत्नाकर (नारायणगाव)