पुणे जिल्हा : मुसळधार पावसामुळे राजगड तालुक्यात जनजीवन विस्कळित

वेल्हे : मागील पंधरा दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजगड तालुक्यातील गाव व वाड्या वस्त्यांवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर रोडवर मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तर जवळ जवळ सर्वच रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. विजेचा लपंडाव तर राजगडकरांच्या पाचवीलाच पुजला आहे. मोबाईलला रेंज नाही आणि असली तरी मोबाईल चार्ज करण्यासाठी विजेचा पत्ताच नाही, अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
बारागाव मावळ गुंजवणे खोरे, १८ गाव मावळ, पानशेत आणि सोंडे व विंझर भागात अशा चोहीकडे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दहा ते पंधरा दिवसांपासून बत्ती गुल असून पिठ गिरण्या बंद असल्याने अनेक घरांमध्ये भाकरी सध्या पाहायलाच मिळत नाही. तर अनेक गावांमध्ये महिन्याला मिळणारे सरकारी धान्य पोहोचलेच नाही. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून तालुक्याची ओळख आहे याची कल्पना असूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे पूर्व नियोजन करण्यात आले नाही, असे स्थानिकांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा स्थितीला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खरे तर पावसाळा सुरू होण्याअगोदर रस्त्यांची कामे होणे अपेक्षित असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने करोडो रुपयांचा निधी मंजूर आहे. काही ठिकाणची कामे झाली आहेत. पण ती निकृष्ट झाली. तर, अनेक कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही आणि आता या मुसळधार पावसामुळे ही कामे सुद्धा दिवाळीनंतरच करावी लागणार असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका असे करण्यात आल्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले. मात्र, येथील विकास कारण कोणालाच सोडविता आले नाही. रस्ते, बीज, पाणी, रेशनिंग धान्य वाटप किंवा महसुली कामे या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. सरकारी अधिकाऱ्यांची अरेरावी, ठेकेदारांचा उन्मत्तपणा आणि राजकीय नेत्यांची उदासीनता तालुक्याच्या विकासाला मारक ठरत आहे.
– आनंद देशमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य, वेल्हे
तालुक्यामध्ये रस्ते वीज किंवा अन्य कामाबाबत सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यास सर्वस्वी प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्यांची कामे करण्यामध्ये चालढकल करण्यात येत आहे. सर्वच स्तरावर ठेकेदारांचे हित जपण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
– किसनभाऊ रसाळ, माजी सरपंच चिरमोडी





