पुणे जिल्हा : गुणवंत शिक्षक पुरस्काराने कुंजीर सन्मानित

वाघापूर – पुरंदर पंचायत समिती यांच्यावतीने 2023-24साठी दिल्या गेलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या तालुक्यातील 62 शिक्षकांचा सन्मान पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता , सर्वांगीण विकास यासाठी उल्लेखनीय कामकाजाबद्दल पुरंदर तालुक्यातील खोपडेवस्ती केंद्र राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सुनील रघुनाथ कुंजीर यांना सपत्नीक गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
सुनिल कुंजीर हे वाघापूरचे रहिवासी असुन त्यांची पुरंदर तालुक्यामध्ये उपशिक्षक म्हणून गेली 25 वर्षे सेवा झालेली असून पिसाळवाडी, चौरेवाडी, जगतापवस्ती (कोथळे), बेंदवस्ती या शाळांमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच शैक्षणिक गुणवत्ता व शालेय सर्वांगीण विकास याबाबत भरीव योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपडेवस्ती या ठिकाणी कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या कामाची दखल घेत पुरंदर पंचायत समिती प्रशासनाने 2023-24 साठी चा पंचायत समिती गुणवंत शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटविकास अधिकारी अमिता पवार, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी आदी उपस्थित होते.





