Pune District : किसनराव बाणखेले यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिले

मंचर : महाराष्ट्राच्या राजकारणात गेली ५० वर्ष सगळ्यात चर्चेत असलेले खासदार म्हणजे माजी खासदार किसनराव बाणखेले उर्फ अण्णा, अण्णांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले. ते म्हणजे आगळे वेगळे विलक्षण व्यक्तिमत्व होय.असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले, कैलास किसनराव बाणखेले व प्रल्हाद नानाभाऊ बाणखेले यांच्या जयंतीनिमित्त मंचर (ता.आंबेगाव) येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आढळराव पाटील बोलत होते. प्रल्हाद बाणखेले, कैलासराव बाणखेले आणि बाणखेले कुटुंबीयांनी देखील समाजाची सेवा केली आहे. देवदत्त निकम म्हणाले, राजकीय आयुष्यात त्यांनी कधीही दुसऱ्याच्या पाच पैशाला देखील स्पर्श केला नाही. राजकीय जीवनात एकमेकांवर टीका, विरोध होत असतो. मात्र, त्यांनी विरोधकांना देखील आपले मानले.
उद्योजक रमेश येवले म्हणाले की, प्रत्येक मनुष्य आयुष्य जगत असतो. मात्र तो ते आयुष्य कसे जगला, माणूस कसा असावा त्याची आठवण किती काळ स्मरणात राहावी. हे अण्णांकडे पाहिल्यानंतर कळते. आजही त्यांच्या स्मृती जाग्या ठेवण्याचे काम तालुक्यात होत आहे. अण्णांसारखा खासदार पुन्हा होणे नाही.
राजाराम बाणखेले म्हणाले की, किसनराव बाणखेले उर्फ अण्णा यांनी त्यांच्या राजकीय जीवनात आंबेगाव तालुक्याला पुढे नेण्याचे काम केले. लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी स्वागत केले. अथर्व बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. लाला बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतीश जाधव,अमित कातळे व सुदर्शन बाणखेले यांनी सूत्रसंचालन केले. ओम बाणखेले यांनी आभार मानले.




