Pune District: इंदापूर बसस्थानकानकात दिवसभर महिला पोलीस ठेवा

इंदापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर बस स्थानकास सोमवारी (दि.3) भेट दिली. यावेळी त्यांनी बस स्थानकामध्ये उपस्थित मुलींशी व महिलांशी संवाद साधला.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिवसभर महिला पोलीस ठेवण्याची सूचना केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतील अटक केलेल्या आरोपीवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी एसटी प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सतत जागृत राहिले पाहिजे.
प्रशासनाबरोबर समाजातील सर्वांची, महिला वर्गाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. बस स्थानकावरती पोलीस मदत केंद्र 24 तास सुरू राहणार आहे. पोलीस वर्दीचा वचक व दरारा कायम राहिला पाहिजे. तसेच महिला, मुलींनी त्रास होत असल्यास तात्काळ एसटी कर्मचार्यांशी, पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, स्थानक प्रमुख संजय वायदंडे, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमेश ढगे या अधिकार्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गाळेधारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.





