Pune District : ज्वारी कापणीची धामधूम; चारा साठवणीला वेग

चिंबळी : गावाकडील शेतांमध्ये सध्या ज्वारी कापणी आणि मळणीच्या कामाची जोरदार लगबग सुरू आहे. शेतकरी आणि मजूर सकाळपासूनच कामात मग्न असून, ट्रॅक्टरच्या मदतीने काढलेल्या ज्वारीच्या चार्याची वाहतूक केली जात आहे. साठवणीसाठी चार्याच्या ओळी व्यवस्थित रचण्याचे काम देखील खेड तालुक्याच्या दक्षिण भागात वेगाने सुरू आहे.
चिंबळी, कुरुळी, निघोजे, मरकळ, मोई, सोळू, केळगाव, धानोरे आदी पसरिसरात यंदाच्या हंगामात ज्वारीचे चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापणी सुरू असून, मजूर हाताने आणि यंत्राच्या मदतीने मळणी करत आहेत. मळणी झाल्यावर ज्वारीचा चारा गठ्ठ्यांमध्ये बांधून तो ट्रॅक्टरमधून शेताच्या एका कोपर्यात किंवा गव्हाणीत हलवला जात आहे.
चार्याच्या ओळी रचून त्याचे योग्य प्रकारे साठवण केले जात आहे, जेणेकरून पावसापासून संरक्षण होईल आणि पुढील काही महिन्यांसाठी जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील. शेतकर्यांसाठी ज्वारीचा चारा अत्यंत महत्त्वाचा असून, तो जनावरांच्या पोषणाचा मुख्य आधार असतो. योग्य प्रकारे साठवणूक केल्यास उन्हाळ्यातही पुरेसा चारा उपलब्ध राहील.
त्यामुळे शेतकरी विशेष काळजी घेत चार्याची योग्य साठवणूक करत आहेत. एकूणच, ज्वारी कापणी, मळणी आणि चारा साठवणीच्या या प्रक्रियेमुळे गावातील शेतीसंदर्भातील कामांना वेग आला आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणारी चार्याची वाहतूक आणि त्याची रचना हे भविष्यातील जनावरांच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मेहनतीला दुप्पट उत्साह देते
ग्रामीण भागातील शेतांमध्ये सध्या ट्रॅक्टर, बैलगाड्या, मळणी यंत्रे आणि काम करणार्या मजुरांची धावपळ सुरू आहे. ज्वारी कापणीच्या या गडबडीत शेतामध्ये एक वेगळे चैतन्य अनुभवायला मिळत आहे. कधी कधी शेतकर्यांच्या चेहर्यावर श्रमाचे थकलेपण दिसते, पण समाधानाची झळाळी त्यांच्या मेहनतीला दुप्पट उत्साह देते.





