Pune District : दातृत्वाला दिशा मिळाल्यास समाजातील समस्या सुटतील

पौड : समाजात पैसा आणि दातृत्व असे दोन्ही घटक अस्तित्वात असून या दोन्ही घटकांना योग्य दिशा मिळाल्यास समाजातील अनेक समस्या सहज सुटतील, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
उमेद फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणारा दिव्यांग मुले आणि त्यांच्या पालकांसाठीचा महाराष्ट्रातील बालक-पालक प्रकल्पाच्या नवीन वास्तूचा पायाभरणी समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी पाटील बोलत होते. पौड येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर उमेद फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राकेश सणस, सचिव लीना देवरे, प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले, अजित नारकर, प्रसिद्ध वास्तूविशारद शिरीष दसनुरकर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ, संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलांच्या निवासी शाळेच्या संस्थापक प्रतिभा केंजळे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल दीपक शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि निवृत्त अभियंता जयंत वासुदेव पारखी आणि सेवा सदन दिलासा केंद्राच्या निवृत्त शिक्षिका सीमा सुहास दाबके, राजेंद्र रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राकेश सणस यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी शिरीष दसनुरकर, प्रतिभा केंजळे, जयंत पारखी आणि दीपक शहा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उमा जोशी यांनी केले.





