Pune District : करवाढ रद्दसाठी दादांकडे पाठपुरवा

राजगुरूनगर : आम्ही 100 टक्के काम करणारे आहोत. नगरपरिषदेने केलेली करवाढ रद्द करण्यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. नगरपरिषद करवाढ विरोधात अॅड. दीपक थिगळे यांनी सुरू केलेला उपोषण आंदोलनास पाठिंबा आहे, असे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
राजगुरूनगर नगरपरिषदेने केलेली भरमसाठ करवाढ तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी सोमवार (दि. 10) पासून अॅड. दीपक थिगळे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला मंगळवारी (दि. 11) दिलीप मोहिते पाटील यांनी भेट दिली.
यावेळी थिगळे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राक्षे, बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका माजी अध्यक्ष वैभव घुमटकर, वैभव नाईकरे, सिद्धार्थ कांबळे, सागर सातकर, सरपंच विजय थिगळे, माणिक होरे, नितीन ताटे, निलेश गवते यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, करवाढ हा वैयक्तिक प्रश्न नाही तर शहरातील नागरिकांचा प्रश्न आहे त्यात राजकारण कोणी करू नये करवाढी विरोधात एकत्र येऊन जुजबी करवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले.
…तर तात्काळ करवाढ रद्द केली असती
चाकण, आळंदी आणि राज्यातील अनेक नागरपरिषदांमधील करवाढ रद्द केली आहे. राजगुरूनगर नगरपरिषेदेच्या अनेक सुविधा नागरिकांना मिळत नाही तरीही जुजबी करवाढ अन्यायकारक आहे. करवाढ हा अर्थकारणाशी संबंध असल्याचा विषय असून अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यामुळे राजगुरूनगर नगरपरिषदेची करवाढ ते नक्की रद्द करतील. मंत्रिपदाची संधी होती ती मिळाली असती तर करवाढ तत्काळ रद्द झाली असती; मात्र जनतेने उलटे केले तरीही 100 काम करू. इमारत नसताना नोंदी केल्या आहेत. पुरावे दिल्यास तात्काळ कारवाई करू, असेही माजी आमदार मोहिते म्हणाले.





