पुणे जिल्हा : बोरी बुद्रुकमध्ये ड्रोनद्वारे शेतजमीन मोजणी

उसामुळे शेतजमीन मोजणीत अडचणी : रोव्हरपेक्षाही ड्रोनद्वारे मोजणी उपयुक्त
बेल्हे – बोरी बुद्रुक येथे शेतजमिनीची मोजणी ड्रोन करण्यास प्रारंभ झाला आहे. या माध्यमातून गावातील संपूर्ण शेतजमिनींचे प्रतिमा अथवा नकाशे तयार करण्यास सुरुवात करण्यात आले आहे.
राज्यात शेतजमिनीच्या तक्रारीत सध्या वाढ होत असून महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्याय निवाडे प्रलंबित आहे. 25-30 वर्षाचे या बाबतचे निकालही प्रलंबित आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतजमीन मोजणी समितीने 2017 साली याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला. स्मार्ट विलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेत जमीन मोजणी करण्याची संकल्पना पुढे आणली, परंतु त्यावेळी अल्प प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या समितीला पुढील काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
दोन वर्ष कोरोना सारख्या महामारीमुळे वाया गेले. त्यामुळे ज्या पद्धतीने काम पुढे जाणे गरजेचे होते ते होऊ शकले नाही, परंतु मोजणी समितीने याबाबतचा पाठपुरावा भूमी अभिलेख विभागाकडे सातत्याने करत राहिले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. आज रोजी बोरी बुद्रुक गावांमध्ये 1609 हेक्टर क्षेत्र असून 1777 गट आहेत, या गटापैकी 1360 गटाधारकानी मोजणी अर्ज व मोजणी फी जमा केली आहे असून उर्वरित 417 गटांचे अर्ज व फी लवकरच जमा होतील, अशी माहिती मोजणी समितीचे रंजन जाधव यांनी दिली आहे.
शेतकऱ्याने आपल्या शेतात वहिवाटीनुसार खुणा उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद देत तीन दिवसांत वहीवाट खुणा उभारून मोजणी समितीस सहकार्य केले. 29 ऑगस्ट रोजी ड्रोन मोजणी प्रारंभ करण्यात आला असून या माध्यमातून गावातील संपूर्ण शेतजमिनींचे प्रतिमा अथवा नकाशे तयार करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. हे नकाशे व भूमी अभिलेख कार्यालयकडील उपलब्ध शेत जमिनीचे नकाशे जुळवले जातील आणि यानंतर कुठे कुठे अतिक्रमण आहे किंवा कुठे तफावत झाले हे पाहून शेतकऱ्यांना रोव्हरच्या सहायाने हद्दी कायम करून दिल्या जातील.
तद्नंतर पत्रक शेतकऱ्यांना दिले जातील, अशी माहिती भूमिअभिलेख जुन्नरचे उपाध्यक्ष ए. एस. गांगुर्डे यांनी दिली आहे. या ड्रोन मोजणीच्या शुभारंभी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी सरपंच पुष्पा कोरडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, गणेश औटी, कोमल कोरडे साखर कारखान्याचे संचालक तबाजी शिंदे, गाव कामगार तलाठी शीतल गर्जे, रंजन जाधव, युवराज कोरडे, भूमिअभिलेखचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरी बुद्रुक गावाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, भूषणावह आहे. येणाऱ्या अडचणींना बाजूला करत आजपर्यंत येथे पोहोचला आहात. या मोजणीमुळे हद्दी कायम होऊन आपापल्यामधील वाद कायमस्वरूपी मिटतील आणि उभ्या महाराष्ट्रात बोरी पॅटर्नच नाव घेतलं जाईल. यामध्ये समिती व शेतकऱ्यांनी योगदान दिले आहे त्या शेतकऱ्यांवर व मोजणी समितीचे अभिनंदन करतो. या बोरी पॅटर्नची ऐतिहासिक नोंद महाराष्ट्र घेईल, याची मला खात्री आहे.
-अतुल बेनके, आमदार जुन्नर
रोव्हरच्या सहाय्याने अडचणी
संपूर्ण गावातील मोजणी रोव्हरच्या सहायाने करण्यास सुरवात आली; परंतु मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या. बोरी हे गाव जास्त प्रमाणात ऊस उत्पादन घेणारे गाव असल्यामुळे वाढलेल्या उसामुळे यामध्ये अडचणी येऊ लागल्या, यावर भूमिअभिलेख व समिती यांच्यात एक बैठक घेण्यात आली व यासाठी काय गरजेचे आहे याबाबत शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील मोजणी कशा पद्धतीने केली जाईल याबाबतची माहिती व नियोजन देण्यात आले.





