पुणे जिल्हा: माजी सैनिकाच्या पत्नीचा शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

निमोणे:- करडे (ता. शिरुर) येथील एका कंपनीत आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी माजी सैनिकाची पत्नी रेश्मा राहुल वाळके (वय ३७) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे (दि २७) जानेवारी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही या चार आरोपींना अटक झालेली नाही. या आरोपीना शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच मदत करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच याबाबत रेश्मा वाळके यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.
करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत माजी सैनिकाच्या पत्नी रेश्मा राहुल वाळके ह्या भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवून त्यांचा राजीनामा घेतला आणि त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढून टाकण्यात आले. याबाबत त्यांचे पती राहुल वाळके आणि रेश्मा वाळके हे कंपनीत विचारणा करण्यासाठी गेलेले असताना सचिन संभाजी वाळके याने दोघा पती-पत्नीला “पुन्हा या कंपनीच्या आवारत दिसला तर तुम्ही दोघे परत कुठेच दिसणार नाहीत याद राख, माझ्या इतके कोणी वाईट नाही” असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दोघांनी संभाजी दगडु वाळके त्यांची मुलगी प्रियांका संभाजी वाळके आणि त्यांचा मुलगा सचिन संभाजी वाळके सर्व (रा. करडे,ता.शिरुर, जि. पुणे) तसेच एक अनोळखी सी ए (CA)आणी सी एस (CS) यांच्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशिर फिर्याद दाखल केली. .परंतु वाळके दांपत्याने शिरुर पोलिस स्टेशनला चार जणांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीच्या काही समर्थकांनी वाळके यांच्या घरावर रात्रीच्या वेळेस दगडफेक करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत केस मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला.
तसेच शिरुर पोलिस स्टेशनचा एक वरिष्ठ अधिकारी आरोपीना मदत करत असल्याने त्याबाबत रेश्मा वाळके यांनी थेट पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पोलिस स्टेशनमध्ये चहा पेक्षा किटली गरम ?
शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके या घटनेचा कसून तपास करत आहेत. परंतु याच पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारी यामध्ये खोडा घालत असल्याचा गंभीर आरोप वाळके दांपत्याने केला असुन याबाबत संबंधित अधिकाऱ्याची थेट लेखी तक्रार पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे या पती-पत्नीने केली आहे.
शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एखाद्या गुन्ह्याच्या तपासाबाबत गांभीर्याने लक्ष घालुन तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुचना देत असताना जर त्याच पोलिस स्टेशनमधील दुसरा अधिकारी आरोपींना मदत करत असेल तर शिरुर पोलिस स्टेशनची “चहा पेक्षा किटली गरम” अशीच अवस्था झाली की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याबाबत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.





