Pune District : महिला कर्मचार्यांना आठ तासाची ड्युटी

नारायणगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारायणगाव (ता. जुन्नर) बस स्थानकात काम करणार्या वाहक महिलांच्या कामाचा कालावधी 12 तासांऐवजी आठ तासांचा करण्यात आला आहे. कामाचा कालावधी कमी झाल्यामुळे काम करणार्या महिलांनी आगार प्रमुख वसंत अरगडे, सहाय्यक अधिकारी तुकाराम पवळे व शुभम खरमाळे यांचे आभार मानून सत्कार केला.
यावेळी वाहतूक नियंत्रक पवन भोर, सहाय्यक वाहतूक नियंत्रक रामदास आवटे, महिला कर्मचारी जयश्री डोके, पुनम हांडे, योगिता जगताप, लता डोके, सुजाता वाघ, आशा मुंढे, अर्चना अभंग, राजश्री पवार, पुष्पा ढाके उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारायणगाव बस स्थानकाच्या अधिकार्यांनी महिला कर्मचार्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
नारायणगाव बस स्थानकात 27 वाहक, 1 चालक व लेखनिक मिळून 40 महिला कर्मचारी काम करीत आहे. त्यामध्ये वाहक म्हणून काम करणार्या महिलांना 12 तासांची ड्युटी असल्याने सकाळी घरातून लवकर बाहेर पडावे लागत होते व ड्युटी संपल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी उशीर होत होता.
एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी महिला कर्मचार्यांच्या ड्युटीचे योग्य पद्धतीने नियोजन करावे यासाठी मागील 15 वर्षांपासून मागणी केली जात होती; परंतु 15 वर्षांच्या कालावधीत नारायणगाव बस स्थानकात अनेक आगार प्रमुखांनी काम केले; परंतु महिला कर्मचार्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार केला गेला नाही.
सर्व महिला कर्मचार्यांकडून आनंद व्यक्त
नारायणगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख वसंत अरगडे यांनी महिला कर्मचार्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून त्यांच्या ड्युटीचे शेड्युल सोयीस्कर करून दिले. महिलादिनी समजूतीने प्रश्न मार्गी लावल्याने बस स्थानकातील सर्व महिला कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला, असे वाहक जयश्री डोके, पुनम हांडे यांनी नमूद केले.





