Pune District : खोलीकरण झाल्याने अवसरीचे तीनही ओढे लागले वाहायला

अवसरी : अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे राज्य शासनाच्या सहकार्याने नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीने तीन पोकलँड मशीनचे साह्याने तीन ओढ्यांचे आठ किलोमीटरचे खोलीकरण करण्यात आले आहे. खोलीकरण केलेल्या ओढ्यात डिंभे धरण उजवा कालव्यातील पाणी सोडल्यानंतर तीनही ओढे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. या पाण्याचा उपयोग परिसरातील सुमारे साडे सातशे एकर क्षेत्र बागायती होण्यास मदत होणार असल्याची माहिती सरपंच सारिका हिंगे यांनी दिली.
अवसरी बुद्रुक येथील ओढ्याचे खोलीकरण केल्याने ओढ्यालगतच्या विहिरी पाण्याने तुडूंब भरल्या असून अवसरी बुद्रुक गाव पाणीदार झाले आहे. नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांनी केलेल्या सहकार्यामुळे समस्त ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याची माहिती उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी सांगितले.
अवसरी बुद्रुक गावच्या सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, कल्याण हिंगे पाटील यांनी नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या अधिकाऱ्यांशी गेली चार ते पाच महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरण करण्यासाठी संपर्क साधला होता. त्यानंतर नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स यांनी अवसरी बुद्रुक गावातील तीन ओढे खोलीकरण्यासाठी तीन पोकलेन मशीन पाठवून दिल्यानंतर १० दिवसात ८ किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी डिंभे उजवा कालव्यातून ओढ्याना पाणी सोडल्यानंतर ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत असल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी गावाच्या आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दहा दिवसात गावाच्या तीनही ओढ्याचे खोलीकरण केल्याबद्दल ग्रामस्थांनी उपसरपंच अनिल हिंगे, सरपंच सारिका हिंगे, सदस्य प्रशांत वाडेकर, कल्याण हिंगे पाटील यांचे आभार मानले.
बाराही महिने बागायती…
अवसरी परिसरातील चव्हाणमळा, घुलेमळा, गुंनगेमळा, हिंगेमळा, माळीमळा, खालचा शिवार, चवरेमळा, एलभरमळा येथील ७०० ते ८०० एकर क्षेत्र बाराही महिने बागायत होणार असल्याने शेतकऱ्यांना कांदा, कोबी, फ्लावर, मिरची, यांसह तरकारी माल ऊस व जनावरांचा हिरवा चारा असलेले गवत, मका, गाजर, कडवळ पिके वारंवार घेता येणार आहे. या सर्व गोष्टीमुळे शेतकरी पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळतील व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी माहिती उपसरपंच अनिल हिंगे पाटील यांनी दिली.





