Pune District : शिरूर तहसील कार्यालयात कुणी कर्मचारी देता का?

शिरूर : शिरूर तहसील कार्यालयात कर्मचार्यांची तब्बल 13 पदे रिक्त असून अपुर्या कर्मचार्यांमुळे नागरिकांची तहसील कार्यालयातील अनेक कामे खोळांबली आहे. नागरिक वारंवार कामासाठी हेलपाटे मारत आहे.त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर नागरीक संतापत आहे. कामाचा मोठा भार निर्माण झाल्याने कर्मचारी तणावाखाली काम करत आहे.
विशेष म्हणजे या कार्यालयात मूळ नियुक्ती असलेल्या तीन जणांची सेवा वरीष्ठांनी एवढी पदे रीक्त असताना स्थलांतरित केली असून मूळ नियुक्तीच्या ठिकाणी ते काम करत नाही. त्यामुळे शिरूर तालुक्यावर मोठा अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आता याकडे नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांनी लक्ष घालण्याची नागरीकांकडून मागणी होत आहे.
शिरूर तालुक्यातील नागरीकांच्या 155 च्या, रस्ता, जमिनीच्या वेगवेगळी खटले कर्मचारी कमी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याची माहिती नागरिकांनी दिली. नागरीकांच्या रखडलेल्या कामासाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी कंबर कसली असून कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी ते अंमलबजावणी करत आहे; परंतु अपुर्या कर्मचार्यांकडे पेन्डसी वाढत चालली आहे.
नायब तहदीलदार, अव्वल कारकून, कर्मचारी उशिरापर्यंत थांबून नागरीकांच्या कामाचा निपटारा करत असून नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु रोज शेकडो अर्ज येत असून अपुर्या कर्मचार्यांमुळे प्रकरणांची वेळेत निर्गती करणे अवघड बनले आहे.
काही कर्मचार्यांवर सेवास्थानांतराची मेहेरबानी नक्की कशासाठी केली जात आहे? वरिष्ठ कार्यालयाकडून हा मात्र संशोधनाचा विषय झाला आहे, पुढील आठ दिवसांच्या आत वरिष्ठ कार्यालयाने जनहित लक्षात घेऊन ही बाबत गांभीर्याने योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन करणे भाग पडेल.
– निलेश वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते
त्यांचे वेतन मात्र शिरूर तहसीलमधूनच
शिरूर तहसीलमधीलरिक्त जागांबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. शुक्रवारी (दि. 24) रिक्त जागांबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील मूळ नियुक्ती असलेले काही अव्वल कारकून, महसूल सहाय्यकांची मात्र सेवास्थानंतरने पुणे व खेड येथे नियुक्ती करण्यात आली आहे यांचे वेतन मात्र शिरूर तहसीलमधूनच देण्यात येत आहे.





