आजपासून षड्रात्रोत्सवाला प्रारंभ जेजुरी – कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी रविवारी (दि.1) भाविकांनी जेजुरी गडावर प्रचंड गर्दी केली होती. कार्तिक महिन्यातील अमावस्या तसेच सोमवार (दि. 2) पासून खंडेरायाच्या षड्र्ात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्याने भाविकांची देवदर्शनासाठी शनिवार (दि. 30 नोव्हेंबर) पासूनच शहरात गर्दी झाली होती. दोन दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवदर्शन घेतले. सोमवारी (दि.2) खंडेरायाचा षड्रात्रोत्सव सुरू होत असून मुख्य गाभार्यातील पाकाळणी विधी उत्सव मूर्तींसह भैरवनाथ मूर्तींना विधिवत नवीन पोशाख परिधान झाल्यानंतर विधिवत धार्मिक विधी होऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बालद्वारी (रंगमहाल) येथे घटस्थापना करण्यात येणार आहे. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नदान सेवा मंडळ, पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ मंडळ व देवसंस्थान समितीच्या वतीने उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे .