Pune District : टाळ-मृदंगाच्या गजरात चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान

वटेश्वर वृत्तांत सांगितला रसाळ ।
पूर्वी आम्ही होतो याची स्थळा ॥
येथून वाट जाते पातळा ।
उडाली शिळा समाधीची ॥
असंन मनोहर मृगलंगन ।
पहा त त्रिंबकेश्वर आनंदाने ॥
सोपान वटेश्वर करिता एकांत ।
कळले मनोरथ नामा म्हणे ॥
सासवड, – वारकरी संप्रदायातील श्री संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी आज सासवड येथून भक्तिभावात निघाली. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंगाच्या ओवाळण्यात आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात हा सोहळा पार पडला.
पालखी सोहळ्याचे प्रमुख जनार्दन वाबळे यांनी प्रस्थानापूर्वी मंदिरात महापूजा, अभिषेक व आरती केली. पंचपदी भजन खळद व गोगलवाडी दिंडीतर्फे सत्कार करण्यात आले. सोमवारी (दि.23) सकाळी 12 वाजता सासवड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
श्री संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने रथाची सजावट करण्यात आली. परिसर फुलांच्या सजावटीने सजला होता. शेकडो वारकरी, महिला भगिनी, वयोवृद्ध भक्त आणि लहान मुले यांचा सहभाग लाभला. अनेकांनी डोक्यावर अभंग-ज्ञानेश्वरीचे ग्रंथ घेत भक्तीने पालखी प्रस्थान सुरू केली.
विविध ठिकाणी पालखीचे स्वागत होणार असून हरिनामाचा गजर, प्रवचन, कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थानिक मंडळांच्या वतीने फळे, पाणी, फराळ व औषधोपचार सेवा पुरविण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्याचा पहिला विसावा कुंभारवळण या ठिकाणी झाला असून रात्रीचा मुक्काम पारगाव येथे होतो. प्रस्थानप्रसंगी पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत, सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डा. कैलास चव्हाण, जनार्दन वाबळे, चोपदार शशिकांत जगताप, किसन गायकवाड, निवृत्ती कुंजीर, बाळासो कामठे, रामभाऊ महाडिक उपस्थित होते.
राजा-सोन्या, सर्जा-राजाला मान
श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान यवत (ता. दौड) येथील बबन महाराज दोरगे यांच्या राजा-सोन्या या बैलजोडीला, नगारखान्यासाठी यवत येथीलच उबन महाराज कुदळे यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीला, तर काटेवाडी (ता. बारामती) येथील ज्ञानेश्वर महाराज काटे यांच्या अश्वाला मिळाला आहे.





