Pune District : थंड पाण्याचा माठ खिशाला पोळतोय

चिंबळी : सध्या वातावरणावरणाचा लहरीपणा कायम असून पहाटे थंडी तर सकाळी 10 वाजेनंतर उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणा-या माठांचे बाजारात आगमन झाले आहे.
कुंभार व्यवसायिकांच्या वर्षभर केलेल्या अपाट कष्टानंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ग्रामीण भागात कुंभाराकडून माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून ग्राहकही खरेदीसाठी येत आहेत. सध्या बाजारात गरिबांचा फ्रीज दाखल झाले आहे. माठांचा कच्चा माल महागल्याने थंड पाण्याचा माठ खिशाला पोळतो आहे.
उन्हाच्या झळा वाढू लागल्यात्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रिज म्हणून संबोधल्या जाणा-या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने यंदा माठाचे दर जवळपास 200 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे.
होळीनंतर तेजी येण्याचा अंदाज
होळीनंतर माठांची मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे माठाच्या बाजारात होळीनंतर तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीच्या माठांना फ्रीज मानून तहान भागवितात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात मागणी असते.





