Venkatesh Buildcon : 6 हजार घरांनंतर आता 10 हजार घरांचे लक्ष्य; ‘वेंकटेश सेरेनिक’ प्रकल्पाचा शुभारंभ
Venkatesh Buildcon : वेंकटेश बिल्डकॉनने २५ वर्षांत सहा हजारांहून अधिक घरे उभारली. आता कंपनीने १० हजार घरांचे लक्ष्य ठेवावे, असे सतीश मगर यांनी सांगितले. बावधनमध्ये ‘वेंकटेश सेरेनिक’ प्रकल्पाचा शुभारंभ झाला.

Venkatesh Buildcon : विश्वास, गुणवत्ता आणि चांगल्या बांधकामासाठी ओळख निर्माण करणाऱ्या वेंकटेश बिल्डकॉनने २५ वर्षांत सहा हजारांहून अधिक घरे उभारली आहेत. आता कंपनीने ‘सेरेनिक’सह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून १० हजार घरांचे लक्ष्य ठेवावे आणि पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे मत मगरपट्टा टाउनशिपचे चेअरमन आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी व्यक्त केले.
बावधन येथील चांदणी चौकाजवळ उभारण्यात येणाऱ्या ‘वेंकटेश सेरेनिक’ या निवासी प्रकल्पाचा शुभारंभ आणि सेल्स ऑफिसचे उद्घाटन सतीश मगर यांच्या हस्ते रविवारी (११ ऑक्टोबर) झाले. यावेळी प्रकल्पाच्या माहितीपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, आमदार शंकर मांडेकर, आमदार किरण सामंत, माजी आमदार अतुल बेनके, माजी आमदार कुमार गोसावी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, नगरसेविका रुपाली पवार, युवानेते विराज भरणे, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे संस्थापक एस. आर. कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, वेंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे, लहूराज आसबे, अरुण राजवाडे, हेमंत गोसावी आदी उपस्थित होते.
आमदार तापकीर यांनी वेंकटेश बिल्डकॉन परिवाराशी नगरसेवक असल्यापासून स्नेह असल्याचे सांगितले. दर्जेदार बांधकाम, योग्य नियोजन आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन घरे उभारल्यामुळे कंपनीने पुण्यात विश्वास निर्माण केला आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार मांडेकर यांनी मुळशीच्या प्रवेशद्वाराजवळ होत असलेल्या नव्या प्रकल्पांमुळे या परिसराला नवी ओळख मिळत असल्याचे नमूद केले.
वेंकटेश बिल्डकॉनचे सीएमडी अंकुश आसबे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ‘वेंकटेश सेरेनिक’ हा प्रकल्प १० एकर जागेवर दोन टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३.७५ एकर जागेवर २८ मजली तीन टॉवर उभारले जाणार आहेत. यामध्ये २ आणि ३ बीएचकेची एकूण ५५० घरे तसेच १३ शोरूम्स असतील.
प्रकल्पात सुमारे ४० हजार चौरस फुटांच्या इनडोअर आणि आउटडोअर सुविधा तसेच सहा स्तरांवरील पार्किंगची व्यवस्था प्रस्तावित आहे. स्विमिंग पूल, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा, योग व ध्यानासाठी स्वतंत्र जागा आणि को-वर्किंग लाउंज यांसह हिरव्या मोकळ्या जागा उपलब्ध असतील. निसर्गरम्य परिसर, एनडीए हिल्सचे दृश्य आणि शहराशी असलेली चांगली जोडणी यांचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आल्याचे आसबे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘वेंकटेश सेरेनिक’मध्ये पहिल्या पाच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि कर्मचारी उपस्थित होते. संचालक अरुण राजवाडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आरजे अक्षय यांनी केले.





