राजगुरूनगर : धामणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन भावंडांची ह्रदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत यशस्वी झाली आहे. शाळेतील सक्षम मनोज चित्ते (वय 7) आणि समीक्षा मनोज चित्ते (वय 9) अशी या दोन सख्या बहिणभावंडांची नावे आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्र.1 आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे येथे आले होते.शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करताना तपासणी दरम्यान दोन्ही बहीणभावाच्या ह्रदयामध्ये काही तरी समस्या असल्याची शंका त्यांना आली. पथकाने याबाबतची माहिती शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना दिली. शाळेचे मुख्याद्यापक धर्मराज पवळे आणि इतर शिक्षकांनी हि माहिती मुलांचे वडील मनोज चित्ते यांना सांगितली. मात्र हॉस्पिटल पर्यंत नेण्याचीही परिस्थिती पालकांची नव्हती. यात शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन या दोन्ही भावंडाना ज्युपिटर रुग्णालय पुणे येथे पोहोचवले. निदानानंतर दोघांनाही ऑपरेशनची गरज असल्याचे समजले. तेव्हा पासून शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या पालकांना वारंवार समजून सांगून त्यांच्या मनाची तयारी करण्यात आली व आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता शाळा व तपासणी पथकाकडून करण्यात आली. अखेर या दोघांचे एएसडी क्लोझर (डऊ लश्रेीशी) ची ह्रदय शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे येथे यशस्वीरित्या पार पडली. दोघांचीही प्रकृती एकदम उत्तम व स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोल पारधे यांनी दिली. आर.एस.बी.के. खेड पथक क्रमांक एकचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल पारधे, डॉ. स्नेहा भोंडवे, औषधनिर्माण अधिकारी रेश्मा भुजबळ, परिचारीका सुवर्णा साळवे, जिल्हा समन्वयक आशिष पुरनाळे, शिक्षक मंगल पिंगळे, अमर केदारी, गोरख नवले, मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी या बहीण भावांची रुग्णालयात असताना विशेष काळजी घेतली.