Pune District : भिगवण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायत अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या अपंग/दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधी अद्याप पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. येत्या आठ दिवसांत जर या निधीचे वाटप केले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीस शनिवारी (दि.15) दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 5टक्के अंध,अपंग,दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वनिधीतील 5टक्के निधी हा दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जाणे गरजेचे आहे. चालू आर्थिक वर्ष (2024-25) संपत आले तरीही भिगवण ग्रामपंचायतीने या निधीचा वापर केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आप्पासाहेब गायकवाड, प्रा.तुषार क्षीरसागर, अॅड. सुरज खटके, अमर धवडे, किशोर पोंदकुले,आकाश उंडाळे, कपिल लांडगे यांनी ग्रामपंचायतीस निवेदन देत इशारा दिला आहे.
सरपंच निवड प्रक्रियेमुळे निधी वाटपासाठी विलंब झाला आहे, मार्च अखेरीस लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल.
– दत्तात्रय परदेशी, ग्रामपंचायत अधिकारी, भिगवणनवीन सरपंच निवड होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून त्यामुळे विलंब होण्याचे फक्त निमित्त आहे. परंतु, सध्या ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. निधीची कमतरता जाणवत आहे त्यामुळे देखील विलंब होत आहे.
– अॅड .सुरज खटके, ग्रामस्थ, भिगवण





