पुणे जिल्हा । आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी 70 टक्के मतदान

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अंदाजे सुमारे 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 3 लाख 14 हजार 252 मतदारांपैकी 2 लाख 710 मतदारांनी मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदारसंघात एकूण 346 मतदान केंद्रांमध्ये सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
सकाळी सात ते अकरा या वेळेत 16.69 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये 32 हजार पुरुष तर 20 हजार 454 महिलांनी मतदान केले होते. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 35.63 टक्के झाली. तर तीन वाजेपर्यंत 49.55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये 81 हजार 425 पुरुष तर 74 हजार 313 महिला व इतर दोन अशा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत 2 लाख 710 मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी 63. 87 टक्के इतकी होती. दरम्यान काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही. या संदर्भात बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, शिरूर भागातील कानूर मेसाई, कारेगाव या भागात उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने आकडेवारी उपलब्ध झाली नाही. मात्र आंबेगाव मतदार संघासाठी 70 टक्के पर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.





