Pune District : सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ गुन्हे उघड

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणून ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा. पांगरी कुटे, जि. वाशिम, असे अटकेतील सराईत आरोपीचे नाव आहे. त्याला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक शिरूर शहर व पोलीस हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्हयातील दुचाकींचा शोध घेतानाच पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना सराईत संतोष ऊर्फ शरद इंगोले याचा मोटर सायकल चोरीमध्ये सहभाग असल्याची महिती मिळाली.
शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाने त्याला मालेगाव परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीने शिरूर पोलीस स्टेशन १, घाड पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा १, चाकण पोलीस स्टेशन १, भोसरी एमआयडीसी १, लोणीकंद १, खडकी १, आळंदी २, महाळुंगे १, दिघी व इतर एक, असे एकूण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, चोरीतील ११ दुचाकी ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रवींद्र आव्हाड यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विशाल कोथळकर करीत आहे.





