पुणे जिल्हा : कुणीही बारामतीतून उभे राहावे

अजित पवारांच्या भावनिक आवाहनावर शरद पवारांचे थेट आव्हान
बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही.
बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळे सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील, अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला वेगळा विचार करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत व्यापारी मेळाव्यात बोलले होते. यासंबंधी बारामतील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही.
पवार म्हणाले. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. गेली 55 ते 60 वर्षे आम्ही काय केले हे जनतेला माहित आहे. बारामतीत उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत, त्या कधीपासून आहेत. उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन सुमारे 54 वर्षे झाली.
कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था 1971 मध्ये स्थापन झाली. त्यावेळी आज आरोप करणारांचे वय काय होते, याची गोळाबेरीज त्यांनी केले तर त्यांच्या आणि जनतेच्याही लक्षात येईल. या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे, असे त्यांनी नमूद केले.





