Pune District : ऊस लागवडीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ; छत्रपती कारखान्याचे मिल रोलर पूजन
भवानीनगर – भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 च्या गळीत हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली असून, दिनांक 7 जुलै रोजी युनिट क्र. 1 चे मिल रोलर पूजन संचालक सतीश देवकाते यांच्या हस्ते, तर युनिट क्र. 2 चे पूजन संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी माहिती दिली की, युनिट क्र. 1 चा हा 70 वा आणि युनिट क्र. 2 चा 9 वा गळीत हंगाम असून एकूण 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
या हंगामासाठी कार्यक्षेत्रात 24,534 एकर आणि कार्यक्षेत्राबाहेर 9,514 एकर, अशी एकूण 34,048 एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेसाठी 315 ट्रॅक्टर, 625 ट्रॅक्टर गाड्या, 968 बैलगाड्या आणि 10 हार्वेस्टर यांचे करार पूर्ण झाले आहेत. संबंधित कंत्राटदारांना अॅडव्हान्सचे वाटप सुरू असून, दोन्ही युनिट्स 1 ऑक्टोबरच्या सुमारास गाळपासाठी पूर्ण सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस शेती उत्पादनात वाढ व्हावी आणि पाण्याचा तसेच खतांचा वापर नियंत्रित व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित योजना राबविली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होणे शक्य असल्याचे प्रयोगांनी सिद्ध झाले आहे.
रोलर पुजनच्या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, अॅड. शरद, जामदार, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, श्री. बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, अशोक पाटील, मंथन कांबळे डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक, अशोक जाधव, तांत्रिक सल्लागार, महादेव निकम, आण्णासाहेब कदम, फायनान्स मॅनेजर, हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी, जालिंदर शिंदे व युवराज रणवरे तसेच बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
600 सभासदांना सहभागी होता येणार
या योजनेत पहिल्या टप्प्यात 600 सभासदांना सहभागी होता येणार असून, प्रति हेक्टर खर्च 25 हजार इतका आहे. यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांचा 9 हजार 250, कारखान्याचा वाटा 6 हजार 750 असून उर्वरित 9 हजार सभासदांनी भरायचे आहेत. योजना स्वीकारण्यासाठी ठिबक सिंचन (ड्रिप) अनिवार्य आहे.योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै असून, इच्छुक सभासदांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले आहे.





