Pune District : शेतीचा जोडधंदा तोट्याचा

नीरा : शेतीला जोडधंदा म्हणून पुरंदर तालुक्यातील शेतकरी दुधाच्या व्यवसायाकडे वळाला. या दूध धंद्यातून त्याच्या हातात चार पैसे खेळू लागले. त्यामुळे पुढे जाऊन शेतकर्यांच्या मुलांनी या जोड धंद्याला मुख्य व्यवसायाचे स्वरूप दिले. मोठ्या प्रमाणात गायी पालन करून डेरी फार्म चालू केले. मात्र 2019 पासून या व्यवसायाला उतरती कळा यायला लागली असून, मागील सात वर्षांमध्ये शेतकर्यांचा गोठा आता रिकामा होताना पाहायला मिळतो आहे. दूध दराबाबत शासनाचे असलेले धरसोड धोरण आणि शेतकर्यांच्या उत्पादित दुधाला मिळणारा कमी दर व वाढत्या पशुखाद्याच्या किमतीने दूध उत्पादन शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे गोठ्यातील गायींची संख्या आता झपाट्याने कमी होऊ लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला 37 ते 40 रुपये भाव मिळत होता. मात्र मागील एक ते दीड वर्षांमध्ये दुधाचे भाव कमी झाले आहेत. दुधाला आता 25 रुपयांपासून ते 35 रुपयापर्यंत भाव मिळतो. शासनाने दुधाचा हमी भाव 36 रुपये जरी निश्चित केला असला तरी खासगी दूध उत्पादक कागदोपत्री दाखवत असलेल्या भावापेक्षा कमी भाव शेतकर्यांना देतात. अर्थात त्यासाठी एसएनएफचे कारण पुढे केल जात. मात्र दुधाची फॅट, डिग्री यामध्ये होणारा घोळ शेतकर्यांच्या पाचवीला पुजला आहे.यावर नियंत्रण ठेवणारी किंवा फॅट डिग्री या मापांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसतं त्यामुळे शेतकर्याच्या दुधाचं मूल्यांकन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शेतकर्याला दिला जाणारा बाजार हा एक उपकार आहे असे डेरी चालक समजत असतात.
जनावरांचा औषध आणि खुराकाचा खर्च वाढला
दुभत्या गायींना द्याव्या लागणार्या खुराकाचा खर्च वाढला आहे.1750 रुपयाला 50 किलो खुराकाच पोत मिळते. गोचडीच औषध 25 रुपयाच 150 रुपये झाले आहे. जनावरांचा चार हजार रुपये पांड (एका एकर म्हणजे 20 पांड) मिळतोय. सिमेन्स सुद्धा महाग झाले आहे.त्यातच या गायींना दोन तीन वेळा सिमेन्स भरावे लागते. कारण गायी उलटण्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्वी लागवड गाय तपासण्यासाठी पैसे घेत नव्हते. आता त्यासाठी 100 रुपये घेतले जातात. सरकारने 5 रुपयाने अनुदान जाहीर केले. आर्ध आले, आर्ध आलेच नाही. नंतर 7 रुपये जाहीर केले. आता देतच नाही, असे म्हणत गुळूंचे येथील शेतकरी सुधाकर निगडे यांनी खंत व्यक्त केलीय.
पशुखाद्याचे दर चढेच; असे आहेत दर
बाजारात सरकी पेंडीच्या बॅगचा दर 1,680 रुपये असून, 35 रुपये किलो दराने विकली जाते. शेंगदाणा पेंडीच्या बॅगचा दर 1,700 ते 2,100 रुपये असून 40 ते 50 रुपये प्रतिकिलो भाव आहे. सुग्रास बॅगची किंमत 1,300 ते 1,700 रुपये असून, 28 ते 34 रुपये प्रति किलो दराने विकली जाते. तर गव्हाचा, मक्याचा भुसा 1,380 ते 1,400 प्रती बॅग (40किलो) दराने मिळते; मात्र सध्या गायीच्या दुधाला 25 ते 35 रुपये लिटर तर म्हशीच्या दुधाला 50 ते 55 रुपये प्रतिलिटर भाव दूध डेअरीवर दूध उत्पादक शेतकर्यांना मिळतो; परंतु हा दर परवडत नसल्याचे सांगण्यात येते. महिना भरल्यावर दूध उत्पादकाला नियमित तारखेला पगार मिळणे अपेक्षित असते; परंतु तसे होते नाही.
गायीचे एक लिटर दूध उत्पादित करण्यासाठी किमान 27 रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासन आणि खाजगी संस्थाचालक फार फार तर 30 रुपयाचा दर देतात. केवळ तीन रुपयावर हा व्यवसाय परवडणार नाही. काही वेळा 25 रुपये दर दिला जातो. त्यामुळे तोट्यामध्ये वाढ होते.
-बाळासाहेब पिसाळ, शेतकरी, पिंपरे खुर्दशासनाकडून केवळ दोन महिन्यांचे अनुदान आले त्यानंतर ते आलेच नाही. मात्र सध्या दुधाला मिळणारा भाव 25 रुपयांपासून सुरू होतो. सरकारने जर दुधाला 40 रुपये हमीभाव दिला तर हा व्यवसाय चांगला चालेल. त्यामुळे सरकारने आम्हाला अनुदान नाही दिले तरी चालेल पण हमीभाव द्यावा.
– शीतल निगडे, दूध उत्पादक, गुळूंचे
शासनाने सध्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधाचा दर 33 रुपये निश्चित केला आहे. मात्र असे असले तरी शेतकर्यांना हा दर परवडणारा नाही. खाद्याचे दर पोत्याला 60 रुपये कमी केले असले तरी ते फारच कमी आहे. त्यामुळे शेतकर्याला किमान 40 रुपये दर मिळायला हवा. त्यातच आता शासनाने दुधाचा अनुदान बंद केले आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात आला की शासन दुधाला एक रुपया वाढवून देत होते. मात्र आता ती देखील वाढ शासनाकडून केली जात नाही. त्यामुळे दुधाला किमान 40 रुपये भाव मिळायला हवा. मात्र दूध उत्पादकांना देखील आपल्या दुधाच्या कॉलिटीकडे लक्ष द्यायला हवे.
– रोहिदास थोपटे, डेअरी चालक, नीरा





