दिल्लीच्या मद्य धोरणामुळे २ हजार कोटींचे नुकसान; ‘कॅग’चा अहवाल लीक

नवी दिल्ली – दिल्लीच्या वादग्रस्त मद्य धोरणाबाबत लीक झालेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवालावरून भाजपने आज आपवर हल्ला तीव्र केला आहे. तर कॅगच्या अहवालाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आप नेते संजय सिंह यांनी कथित अहवाल भाजप कार्यालयातून आला आहे का, असा सवाल केला.
अहवालात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मोठ्या त्रुटी आणि उल्लंघने अधोरेखित करण्यात आली आहेत. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी या अहवालाने नवा वाद निर्माण केला आहे.
कथित कॅग अहवालातील काही भाग लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यात असा आरोप आहे की दिल्ली सरकारच्या मद्य धोरणामुळे राज्याचे 2,026 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, यासह लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी), कॅबिनेट आणि विधानसभेच्या महत्त्वाच्या मंजुरींकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाने तज्ज्ञ पॅनेलच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. कथित अहवालाचा फायदा घेत भाजपने आप सरकारवर घोर भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.
भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले, जर त्यांची (आप) धोरणे इतकी चांगली होती, तर त्यांनी ती मागे का घेतली? आज आपकडे दिल्लीचे तुटलेले रस्ते, घरातील घाण पाणी, वाढती वीज बिल, कचऱ्याचे डोंगर आणि प्रदूषण यावर उपाय नाही. आज दिल्लीच्या लोकांना ‘आप’पासून स्वातंत्र्य हवे आहे.
आपचे खासदार संजय सिंह यांनी कथित अहवालाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय सिंह यांनी विचारले, कॅगचा अहवाल कुठे आहे? तुमच्याकडे त्याची प्रत आहे का? ती भाजपच्या कार्यालयात बनवली आहे का? भाजप घाबरले आहे. ते मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले आहेत. एकीकडे ते सांगत आहेत, कॅगचा अहवाल अजून सादर झालेला नाही, पण दुसरीकडे ते सांगतात की तो जाहीर झाला, याचा अर्थ काय?
या हल्ल्यात काँग्रेसही सामील झाली आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यास उशीर झाल्याची टीका केली आणि हा अहवाल दडपण्यासाठी भाजप आणि आप यांच्यात समझोता झाल्याचे संकेत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी या धोरणाचे वर्णन स्पष्ट घोटाळा असे केले आणि केजरीवाल सरकारवर सरकारी निधीचा अपव्यय केल्याचा आरोप केला.





