शिरूर : शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची कामे सुरू केली होती. गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी अनेक घरांची कामे घेतली. सुरुवातीला बांधकाम सुरू करून नंतर कामे अर्धवट ठेवून सर्व आरोपी गाव सोडून निघून गेले. या कामांसाठी रोख व ऑनलाइन स्वरूपात लाखो रुपयांची रक्कम आरोपींकडे दिली होती. यामध्ये भानुदास थोरात यांच्याकडून सर्वाधिक १३.५० लाख, खंडू शिंगाडे यांच्याकडून १३ लाख, म्हस्कू थोरात यांच्याकडून १२.१० लाख, तर अभिमन्यू बारहाते, मंगल पानगे, शंकर शिंदे, मंगल शिंगाडे आणि मंगेश फुलसुंदर यांच्याकडून अनुक्रमे लाखो रुपयांची रक्कम घेण्यात आली होती. अर्जदार मंगेश फुलसुंदर यांच्याकडून बांधकाम साहित्यदेखील घेतले गेले होते. तसेच अर्जदार भानुदास थोरात हे आरोपींच्या मूळ गावी नैताळे (जि. नाशिक) येथे गेले असता, त्यांना धमकावण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तक्रारीनुसार, दि. ३१ मार्च २०२५ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दि. ४ एप्रिल रोजी पुन्हा अर्ज सादर करून सर्व आरोपींवर फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांनी घराच्या अर्धवट बांधकामाचे फोटो, बँक स्टेटमेंट व ऑनलाइन व्यवहाराचे पुरावेही पोलिसांना सादर केले आहेत. घर बांधणी कामासाठी विश्वास संपादन करून काम अर्धवट ठेवून लाखो रुपये जमा करून पळून जाणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.