Indapur News : इंदापूर शहरात ठेकेदाराकडून दिवसा विजेची चोरी

इंदापूर : इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून देखील,येथे दिवसाढवळ्या शहरातील नागरिक नव्हे तर,कोटयावधी रकमेचे काम घेतलेला एक ठेकेदार,चक्क वीज वितरण कंपनीची वीज बेकायदेशीरपणे चोरून काँक्रीट करण्याचे काम करतो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल येथील,गाळे धारकांचे त्या चोरलेल्या विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
सध्या इंदापूर शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून कोटयावधी रकमेची विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील नागरिक राज्य शासनाच्या,केंद्र शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या कामावर खुश आहेत.असे असले तरी देखील काही परप्रांतीय ठेकेदार इंदापूर शहरातील कामात केवळ,आर्थिक गणिताची लुडबुड करून घुसले आहेत. त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही.आम्हीच या शहराचे करते धरते आहोत असा आवेश आणून, आपल्या कामावर अनाधिकृत बोगस बेकायदेशीर वीज देखील आकड्यावर वापरत आहेत.
एम.एस.सी.बी ही वीज वितरण कंपनी एखाद्या गरीब कुटुंबाने जर वीज कनेक्शन चोरून घेतले तर थेट त्याच्यावर गुन्हा दाखल करते. त्याच्याकडून दंड वसुली करते. मात्र (ता.१८ मार्च)रोजी शहरातील तालुका प्रशासकीय कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल आवारातील ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी वीज चोरी करून कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे येथील गाळेधारकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये प्रत्येक गाळ्यात असणारी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली.
यानंतर येथील गाळेधारकांनी थेट इंदापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात लेखी निवेदन देखील दिले. संबंधित ठेकेदाराने झालेले नुकसान भरपाई करून देतो असा नुसता शब्द दिल्यामुळे गाळेधारक शांत झाले. मात्र अशा बेकायदेशीर वीज चोरी करणाऱ्या यंत्रणेवर वीज वितरण कंपनी कधी गुन्हा दाखल करणार हा सवाल उपस्थित होत आहे.





