Pune District: करपलेल्या वृक्षवल्लींसाठी जीवदान

माळेगाव : माळेगाव बुद्रुक येथे स्व. अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समाजकंटकांनी पेटविल्याने मोठ्या नुकसानातून सावरत असताना झाडांना जीवदान देण्याचे काम नगरपंचायतीकडून सुरू असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य प्राचार्य अवधूत जाधवर व गटनिर्देशक संतोष सपकळ यांनी दिली.
अज्ञात समाजकंटकांनी काडी टाकून लावलेल्या आगीत दहा एकर क्षेत्रातील तब्बल एक हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची घटना प्रशिक्षण संस्था येथे (दि.११) घडली होती. जळालेल्या झाडांना जीवदान देण्याचे काम माळेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, माजी सरपंच दीपक तावरे यांच्या पाठपुराव्यातून होत आहे.
झाडांना आग लागल्यावेळी झाडांना असलेली ड्रीपही जुळून खाक झाली होती. त्यामुळे झाडांना पाणी देण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून झाडांना आळी करून त्या ठिकाणी रोज टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे.
माळेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दहा एकर क्षेत्रावर वनविभाग बारामती यांनी तीन एकर व संस्थेतील शिक्षकांनी सात एकरांवर वर्गणी काढून विविध प्रकारची झाडे तीन वर्षांपूर्वी लावली होती. उत्तम संगोपन केल्याने वृक्षराजी बहरली होती. परंतु आगीमुळे सर्व झाडे जळाली आहेत. त्या झाडांना जीवदान देण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केल्याने शिक्षक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.





