पुणे जिल्हा : दौंड रेल्वेस्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग

सुदैवाने जीवितहानी नाही : रेल्वेचे मोठे नुकसान
दौंड – पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली. सोमवार (दि.17) रोजी साडेचारच्या दरम्यान दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाच्या बाजूला यार्ड ट्रॅकवर उभ्या असलेल्या रेल्वे रॅकच्या बोगीत अचानक आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
बोगीला आग लागल्याचे समजताच दौंड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या आगीत रेल्वेच्या डब्याचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत पाइपमधून पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला.आग लागताच रेल्वेस्थानाकातील इर्मजन्सी अलार्म वाजल्याने संबंधित स्थानकारील यंत्रणा देखील तत्काळ कामाला लागली.आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ
टळला आहे.
आगीची दुसरी घटना
दौंड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या साइड यार्डजवळ उभ्या असलेल्या रेल्वे रॅकच्या बोगीत अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मागील काही महिन्यांपूर्वी याच दौंड रेल्वेस्थानकावर एका बोगीला आग लागल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा रेल्वे बोगीला आग लागली आहे. त्यामुळे दौंड रेल्वेस्थानकावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.





