मंचर : प्रशिक्षणार्थीना मानव-बिबट्या संघर्षाच्या अनुषंगाने तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे प्रशिक्षित आपदा मित्र, वन्यप्राणी बचाव पथक तयार करण्यासाठी आपत्ती क्षेत्रातील सुमारे ३८८ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या आपदा मित्रांपैकी पहिल्या टप्प्यात ६२ सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली. मानव बिबट संघर्षाच्या अनुषंगाने तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे प्रशिक्षित आपदा मित्र वन्यप्राणी बचाव पथक तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पुणे व वनविभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा मित्र प्रशिक्षण घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे घेण्यात आले असल्याचे सांगितले. आपदा मित्र प्रशिक्षणामुळे जुन्नर वन विभागातील वाढता मानव-बिबट्या संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणार्थीना विषय तज्ज्ञांकडून वन्यप्राणी बचाव, वन्यप्राण्यांचे जीवनमान, हाताळणी, जंगल आणि वणवा, सर्पदंशानंतर करावयाचे प्रथमोपचार, सापाचे प्रकार तसेच वन्यप्राण्यांशी निगडित विविध माहिती नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती देण्यात आली. प्रशिक्षण कालावधीत वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा कर्नल व्ही. एन. सुपनेकर, महेंद्र ढारे, राहुल रघुवंश, संदीप पवार, राहुल पोखरकर, लखन गायकवाड, अक्षय चव्हाण, डॉ. सदानंद राऊत, रमेश खरमाळे, सहायक वनसंरक्षक अमृत शिदे आदींनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. नैसर्गिक धोक्यांसाठी आपदा मित्र प्रशिक्षण… जुन्नर वन विभागांतर्गत असणाऱ्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील गावे बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी अतिसंवेदनशील झाल्याने जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून सुमारे २३३ गावांना बिबट्याच्या हल्ल्यासाठी जून २०२४ मध्ये आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांसह इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीतील धोक्यांची तीव्रता कमी करणे, क्षमता सबलीकरण, पूर्वतयारी, तत्पर प्रतिसाद, आपत्ती परिणामांची तीव्रता व व्यापकता पडताळून पाहणे, स्थलांतर, मदत, बचाव कार्य, पुनर्वसन, पुनर्रचना आदी उपयुक्त उपायांची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असणारा पथदर्शी, असा आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याबाबत मार्गदर्शन… *वन्यप्राण्यांपासून बचाव कसा करावयाचा *जंगलातील वणवे व इतर नैसगिक आपत्ती *सर्पदंशानंतर करावयाचे प्रथमोपचार