Pune District : बारामतीचे दहावे कृषी प्रदर्शन गुरूवारपासून

बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षीचे १० वे कृषिक प्रदर्शन दि. १६ ते २० जानेवारीदरम्यान होत असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे उपस्थित होते.
दि १५ रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री तसेच क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित राहणार आहेत. पंधरा तारखेच्या उद्घाटनानंतर दि. १६ तारखेपासून हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले राहणार आहे.
थेट प्रात्यक्षिकावर आधारीत कृषी प्रदर्शनाचे हे १० वे वर्ष आहे. दरवर्षी देशभरातून अडीच ते तीन लाख शेतकरी भेट देतात. तब्बल १७० एकर प्रक्षेत्रावर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. राजेंद्र पवार हे १९८० च्या दशकात अमेरिकेतील मिशिगन स्टेटमध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा कॉन्टीमध्ये त्यांनी अशा प्रकारचे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते.
नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खते केवळ पिशव्यांमधून दाखविण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष शेतीतील वापर, त्यांचा त्या पिकावरील प्रभाव व प्रत्यक्ष उत्पादन पाहता येत असल्याने ते अधिक प्रभावी ठरते, याच संकल्पनेतून दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते.
कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना
सीईंग इज बिलीव्हींग या उक्तीनुसार प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवला जात नाही. दहा वर्षे जगभरातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञान शेतीत वापरले जावे, त्यातून शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा व उत्पादन वाढावे या हेतूने या प्रदर्शनाची संकल्पना आखली. दरवर्षी नवनवी संकल्पना घेऊन प्रदर्शनाची सुरवात केली गेली. जागतिक स्तरावरील विकसित तंत्रज्ञान पाहता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना हे या कृषी प्रदर्शनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
काळा टोमॅटोची प्रात्यक्षिके
नाविन्यपूर्ण फळझाडांची लागवड, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या २९ प्रकारची फुलशेती, खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार व उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटो व २९ प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण, अधिक तिखट गुणधर्माची काळी मिरची, मिरचीची विविध प्रात्यक्षिके, जिरायत शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण तुर्की बाजरी, चीया, टोमॅटो, कापसाची नवीन तंत्रज्ञानावर आधारित लागवड, काढणी प्रात्यक्षिके, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य, भोपळा, शेवगा, काकडी, कलिंगड, खरबुजाच्या विविध वाणांची प्रात्यक्षिके, मक्याची चायनीज तंत्राद्वारे होणारी लागवड, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चातील शेळी पालन, कोंबडी पालन व मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनात असणार आहे.





