Pune : लोकअदालतीत कोट्यवधींचा वाद निकाली

पुणे : राज्यातील सर्वात मोठ्या रक्कमेचा व्यावसायिक वादाचा दावा समुपदेशनाद्वारे निकाली निघाला आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने तडजोड झालेल्या दाव्यात ३ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. शनिवारी (दि.१०) झालेल्या लोकअदालतमध्ये उत्पादक आणि पुरवठा कंपनीतील हा वाद मिटवण्यात आला. यामध्ये पुरवठादाराने उत्पादक कंपनीला वरील रक्कम दिली. प्रशिक्षित मध्यस्थ अॅड. अतुल गुंजाळ यांनी याप्रकरणी यशस्वी समुपदेशन केल्याने दाखल होण्यापूर्वीच दावा निकाली निघाला.
व्यावसायिक न्यायालय अधिनियम २०१८ नुसार ॲटलास केमिकल्स कंपनीने एबीसी इन्क कंपनीविरोधात ४ कोटी ९० लाख ३७ हजार ४३९ रुपयांच्या वसुलीसाठी दावा दाखल केला होता. हा दावा प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांनी मध्यस्थीसाठी अॅड. अतुल गुंजाळ यांच्याकडे पाठविला.
ॲटलास केमिकल्स कंपनीने वसुलीची सर्व रक्कमेची मागणी केली असता एबीसी इन्क कंपनीनीने अडीच कोटी रुपये देणे असल्याची भूमिका घेतली. ॲटलास कंपनी मात्र व्याजासह ही रक्कम ५ कोटी असल्यावर ठाम होती. दावा दाखल करणाऱ्या पक्षकाराचे वय ७८ तर दुसऱ्याचे वय ७५ असल्याने त्यात पुढील २० ते २५ वर्षे दावा चालणार असल्याने शिवाय दोन्ही बाजूंना वकिलांचा खर्च, होणारा मानसिक त्रास आदी बाजू समुपदेशनाद्वारे मांडण्यात आल्या, त्यामुळे तडजोड ३ कोटी रुपयांमध्ये हा दावा अखेर निकाली निघाला.
राज्यातील पहिला आणि सगळ्यात मोठ्या रक्कमेचा व्यावसायिक वादाचा दावा समुपदेशनाद्वारे निकाली काढल्याचा आनंद वाटतो. अधिकाधिक लोकांनी तडजोडीने दावे निकाली काढावेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचा वेळ, पैसा वाचणार आहे.
– अॅड. अतुल गुंजाळ, प्रशिक्षित मध्यस्थ




