Pune : बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा

पुणे – पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मैदानात उतरला आहे. संचालक मंडळ बरखास्त करून सर्व संचालकांची ईडी व इन्कम टॅक्स विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे; अन्यथा न्यालयात धाव घेऊ, असा इशारा पक्षाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे आणि संघटक विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
संचालक आल्यापासून बाजार समितीत टेंडर, सेस घोटाळा, मोशी बाजारातील दिलेले गाळे, सुरक्षा रक्षकांमध्ये झालेला घोटाळा, डमी व्यापार्यांच्या माध्यमातून होत असलेली शेतकर्यांची पिळवणूक, बेकायदा पद्धतीने पार्किंग वाटप, टपर्या उभारणे, आडतदारांचे दप्तर तपासणी, जी ५५ जागेवरील अनधिकृत वसुली, फूल बाजार घोटाळा यांसह विविध गैरकारभाराचे आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप लवांडे यांनी बाजार समितीच्या संचालकावर केले आहेत.
पालकमंत्री अजित पवार यांना सकाळी उठून प्रत्येक काम पाहण्याची व गुणवत्ता तपासण्याची सवय आहे. चांगली सवय आहेड परंतु त्यांनी पुणे बाजार समितीत पहाटे येऊन सर्व बाजाराची पाहणी करावी. त्या वेळी आम्हालाही बोलवावे. त्यानंतर दोषींवर सक्त कारवाई करावी, अशीही मागणी लवांडे यांनी केली.
मागील वीस वर्षांपूर्वी बाजार समितीतील घोटाळ्याप्रकरणी मुलाणी समितीने चौकशी केली होती. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. उलट त्यातील पाच संचालक आत्ताच्या संचालक मंडळात आहेत. त्यामुळे नव्याने होणारी चौकशी ही निःपक्ष व्हावी. त्याचबरोबर या सर्वच संचालकांची ईडीमार्फत चौकशी करून पालकमंत्री आणि पणनमंत्र्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही लवांडे यांनी केली.





