Pune | धायरी फाटा पुल ‘वाय’ मार्ग करा

पुणे – धायरी फाटा येथील स्व. रमेशभाऊ वांजळे उड्डाणपुलाला “वाय’ फाटा करण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाचे) विधानसभा प्रमुख महेश पोकळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेने २०१९-२० च्या अंदाजपत्रकात याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर धायरीकडे जाणारी वाहने अवघ्या काही मिनिटांत धायरी फाटा येथे येतील. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. धायरी फाटा येथील उड्डाणपुलाचा उपयोग धायरी, नऱ्हे या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना होत नाही.
तसेच उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावरून धायरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. त्यातच सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाल्यास वाहने वेगाने धायरी फाट्याकडे येतील. या वाहनांसाठी सध्याचा असलेला रस्ता अतिशय कमी पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतील.
अशा स्थितीत या वाहनांसाठी उड्डाणपुलावरून “वाय’ आकाराचा फाटा दिल्यास वाहने उड्डाणपुलावरून थेट धायरीकडे जातील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पोकळे यांनी केली आहे.





