Pune: अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही पोलिसांचा कानाडोळा

कोंढवा – गोकुळनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आमदार चेतन तुपे यांच्यासह पुणे पोलीस आयुक्त, कोंढवा पोलीस यांना निवेदन देत या परिसरातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यानंतरही अशा धंद्यांवर कोणताही कारवाई झालेली नाही. राजरोसपणे हे व्यवसाय सुरूच आहेत. पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गोकुळनगर ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.
कोंढवा बुद्रुक गोकळनगर दिल्ली नं.5 येथील गणेश विश्व सहकारी गृहरचना सोसायटीच्या आसपासचा भाग कायमस्वरूपी गजबजलेला असतो. या परिसरात मटका तसेच इतर अवैध धंदे सुरू आहेत, असा व्यवसाय करणाऱ्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नाहीत.
पोलिसांनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांची व्यथा लक्षात घेत अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुसुदन कोरेकर, सेक्रेटरी दिलीप गिते यांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे असेही मत आहे की, रात्री उशिरापर्यंत काही तळीराम रस्त्यालगत असलेल्या मैदानात बिनधास्त दारू पीत बसतात, बाटल्या फोडतात. भांडणे करीत शिवीगाळ करतात. यामुळे या परिसरातील सार्वजनिक शांतता भंग झाली आहे.
निवृत्तीकडे झुकलेल्या आयुष्याला काही दिवस शांततेचे मिळावेत, यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक एकत्रित आलो आहोत. दिवस आनंदात व मजेत घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. मात्र, अवैध व्यावसायिकांनी आमची झोप उडविली आहे, अशी व्यथा ज्येष्ठ नागरिकांनी मांडली आहे. पोलिसांनी संबंधितावर त्वरित कारवाई करावी. अन्यथा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर आम्ही उपोषण करू, असा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.
कोंढवा परिसरातील अवैध धंद्यावर कोंढवा पोलिसांची नियमित कारवाई सुरूच असते, तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन गोकुळनगर भागातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन तातडीने कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
– स्वराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, खडी मशिन पोलिस चौकी, कोंढवा पोलीस ठाणे





