Pune: विरोधकांचे मुद्दे वेळीच खोडून काढा; चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

पुणे – विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अपप्रचार करत असून, खोटे मुद्दे मांडत आहेत. हे मुद्दे वेळीच खोडून काढा, असा आदेशवजा सल्ला राज्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या शहर कार्यकर्त्यांना दिला.
पाटील यांनी सलग दोन दिवस पुण्यात भाजपच्या सर्व आघाड्यांच्या बैठक घेत याबाबत सूचना केल्या असून, लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. काँग्रेसकडून भाजप विरोधात आक्रमक प्रचार केला जात असल्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पाटील यांनी शुक्रवारी महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल यांची बैठक घेतली.
शनिवारी अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला, तसेच पदाधिकाऱ्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्या.
या बैठकीला शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवी साळेगावकर यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते





