Pune: गणेशोत्सवात जटोली शिवमंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. या मंदिराची प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन आणि दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.
जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिड ने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुसऱ्या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी ३९ वर्षे लागली. या मंदिराची उंची अंदाजे १११ फूट आहे. मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर डमरूसारखा आवाज देखील येतो.
गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १११ फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून, भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.





