Pune Crime : महिलेचा सायबर सापळा! मिठाई विक्रेत्याला ब्लॅकमेल करत केली लाखोंची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – समाज माध्यमातील ओळख एका मिठाई विक्रेत्याला महागात पडली आहे. एका महिलेने त्याला दोन लाखांची खंडणी मागितली असून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, स्नेहा मोहित कदम ( ३०, रा. सांगली) हिच्याविरुद्ध गुन्हा झाला आहे. तक्रारदार मिठाई विक्रेता लष्कर भागात राहायला आहे. त्यांचे लक्ष्मी रस्त्यावर दुकान आहे. समाज माध्यमातून त्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने जाळ्यात ओढले. २५ सप्टेंबर रोजी आरोपी दुकानात आली.
त्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन गल्ल्यातील ५०० रुपये आणि मिठाईचे खोके ती निघून गेली.त्यानंतर आरोपीने पुन्हा कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ७० हजार घेतले. त्यानंतर आरोपीने प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख रुपये मागितले. विक्रेत्याने दुकानात बोलाविले असता तिने नकार दिला. ऑनलाइन दोन लाख पाठविण्यास सांगितले. विक्रेत्याने ऑनलाइन २५ हजार रुपये पाठविले. महिलेच्या धमकीमुळे विक्रेत्याने अखेर तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.





