Pune Crime : वाघोलीत भरवस्तीत दोन घरे फोडली! 13 तोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – वाघोलीत चोर्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गावठाणातील भरवस्तीमध्ये दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून 13.1 तोळे सोन्याचे दागिने व 50 हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरातील कुटुंबीय सकाळी कामानिमित्त बाहेर गेले असता घराचा कोयंडा तोडून घरात ठेवलेले जवळपास 10.5 तोळे सोन्याचे दागिने व 15 हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सिद्धार्थनगर येथे मंगळवारी (दि. 30) घडली.
त्याचप्रमाणे येथून जवळ अजमेरा रेसिडेन्सी जवळील गजानन पुरभे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी जवळपास 2.6 तोळे सोन्याचे दागिने व 35 हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी दोन्ही घरातील चोरीप्रकरणी नितीन वाघमारे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





