Pune crime : सिग्नलवर धडकाचा बहाणा करून मोबाईल चोरी करणारी ‘टक-टक’ टोळी जेरबंद !
अलंकार व विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे – सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून चालकांचे लक्ष विचलित करत गाडीतून मोबाईल व इतर वस्तू चोरणाऱ्या परराज्यीय ‘टक-टक’ टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी रवी ओमप्रकाश कोहली (वय ३८) व अफजल कय्युम अब्बासी ( ३८, दोघेही रा. मेरठ, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-१ कडील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी दोन संशयित इसमांचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे व हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहेत.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लॉज परिसरात सापळा रचला. मिळालेल्या वर्णनानुसार दोन इसम तेथे येताच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी फरासखाना परिसरातील गुन्ह्यासह पुणे शहरातील आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपींनी अलंकार पोलीस ठाणे हद्दीत ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून भगव्या रंगाचा अॅपल आयफोन-१७ प्रो व पांढऱ्या रंगाचे पॉकेट चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.
तसेच १९ ऑगस्ट २०२५ रोजी विमाननगर चौकात स्विफ्ट कार चालकाला गाडी पायावरून गेल्याचा बहाणा करून गाडीतून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे मोबाईल चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले. या घटनेबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पुणे शहरातील फरासखाना, अलंकार व विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, महिला पोलीस अंमलदार ज्योती मुल्का व चालक पोलीस अंमलदार प्रफुल शेलार यांनी सहभाग घेतला.





