प्रभात वृत्तसेवा पुणे – नगर रस्त्यावरील चंदननगर भागात एकाच कुटुंबातील तीन महिलांना गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.सोनाबाई अंकुश पवार (५०), सुवर्णा अशोक पवार (२५), शालन कांतीलाल जाधव (४५, तिघी रा. खुळेवाडी, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विक्रीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक नितीन राठोड आणि कर्मचारी चंदननगर भागात गस्त घालत होते. त्यावेळी खुळेवाडी परिसरात महिला गांजाची विक्री करीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पवार, जाधव यांना ताब्यात घेतले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद शेळके यांच्या पथकाने कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी वानवडीतील साळुंखे विहार रस्ता परिसरात एका तरुणाला गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती.